एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा_ मुंबई प्रतिनिधी :एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे न...
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा_
मुंबई प्रतिनिधी :एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे.
राजभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचेच अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी निर्णय करू शकणारी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज राजभवनात फक्त एकनाथ शिंदे हेच शपथ घेतील. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले जाणार असले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत