जयंत पाटलांची आज 'ईडी'कडून चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन मुंबई प्रतीनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रद...
जयंत पाटलांची आज 'ईडी'कडून चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
मुंबई प्रतीनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोमवारी (ता. १५ मे) सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली होती. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावले होते.
त्यानुसार पाटील चौकशीसाठी आज (ता. २२ ) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पाटील 'ईडी' कार्यालयात उपस्थित राहण्यापूर्वीच जयंत पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आहे.
पाटील यांना शुक्रवारी (ता.१९) सकाळी जबाब नोंदवण्यासाठी 'ईडी'ने बोलावले होते. त्यावर त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. त्यानुसार जयंत पाटील (Jayant Patil) यांना ता. २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार पाटील यांचा आज 'आयएल अॅण्ड एफएस'ने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी ईडी चौकशी करणार आहे. जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आता इस्लामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापविरोधात ठिय्या आंदोलन छेडले आहे. तसेच जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करीत आहेत. जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरही लावले आहेत. यावर जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, "चौकशीच्या पार्श्वभूमीवर सतत फोन सुरू आहेत. कार्यकर्ते मुंबईला आले आहेत. अनेकांना येऊ नका असे सागंतिले आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. जे प्रश्न विचारतील त्याला उत्तर देईल. मला माहिती आहे का चौकशी होतेय ती. मात्र आयएल अॅण्ड एफएस या कंपनीशी माझा जीवनात संबंध आलेला नाही."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत