तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मुंबई प्रतिनिधी : नगरव...
तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई प्रतिनिधी : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? असा थेट सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला. फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना त्यांनी शिंदेंचा नामोल्लेख टाळला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या किंवा प्रस्ताव ठेवताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी नकोत, अशी थेट भूमिका कधीच घेतलेली नव्हती. मात्र ठाकरेंनी तसा प्रश्न विचारत शिंदेंच्या मनातील खदखद जाणून घेण्याचाच प्रयत्न केल्याचं दिसतं. माझ्याऐवजी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, असंही यावेळी ठाकरे म्हणाले. त्यामुळे भाजपशी हातमिळवणी करुन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार आहे का, असा पेचात टाकणारा सवालच उद्धव ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे.
अलीकडच्या काळात अनेकजण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना राहिली नाही, अशी टीका सातत्याने करत असतात. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील आणि आताच्या शिवसेनेत नेमका काय फरक आहे, हे मला सांगावे. २०१२ साली बाळासाहेब ठाकरे गेले. त्यानंतर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीत एकट्याने लढून ६३ जागा जिंकल्या. त्यानंतर अनेकजण मंत्री झाले. पण आता अनेकजण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हवी असं म्हणत आहेत. पण मधल्या काळात तुम्हाला जी मंत्रिपदं मिळाली होती, ती बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली होती, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना खडसावले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत