श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले; गृहिणींचे बजेट कोलमडले. नवी मुंबई प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत ...
श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले; गृहिणींचे बजेट कोलमडले.
नवी मुंबई प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असून, यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. जो काही भाजीपाला येत आहे, त्यात पाण्याने भिजलेल्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातून होणारी भाज्यांची मागणी पूर्ण होत नाही. परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असून, या आठवड्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच ६० ते ८० रुपये किलोच्या घरात पोहचल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो भाजीसाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच भाजीपाला भिजून पॅकिंग होत आहे. तिथून मुंबईच्या बाजारात आणण्यासाठी हा भाजीपाला गाडीतून आणला जातो. मुंबईतील घाऊक बाजारात माल पोहचेपर्यंत तीन ते चार तास जातात. भिजलेला असल्याने गाडीत हा माल खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सध्या घाऊक भाजीपाला बाजारात चांगला भाजीपाला कमी प्रमाणात दिसत आहे. पाऊस असल्याने शेतकऱ्यांना शेतात भाजीपाला काढायला, त्याची पॅकिंग करायला मजूर मिळत नाहीत. पावसात भिजत काम करायला कामगार मजूर येत नाहीत. त्यामुळे आधीच मालाची आवक कमी होत आहे, त्यातच ओला असल्याने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत