राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का नाही पुढे आणले ; मनिषा कायंदे यांनी केला सवाल. मुंबई प्रतिनिध...
राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का नाही पुढे आणले ; मनिषा कायंदे यांनी केला सवाल.
मुंबई प्रतिनिधी : राज्यातील सत्तापालटानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत फूट पडण्यासाठी उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच संपली, उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे हेच असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना एक सवाल विचारला. राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे का आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही, असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला. यावर आता मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री आहेत का? ते नावालाच मुख्यमंत्री आहेत? जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मग भाजपच्या दिल्लीतील बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीसच कसे असतात?, असा सवालही कायंदे यांनी उपस्थित केला. पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा माईक खेचताना आणि त्यांना चिठ्ठी देताना सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे सरकारचा कारभार कसा आहे, हे वेगळं सांगायला नको, असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत