'अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा'; मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले ट्विट . मुंबई प्रतिनिधी : राज्...
'अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा'; मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले ट्विट .
मुंबई प्रतिनिधी : राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेल्या मनसेला आगामी काळात 'अच्छे दिन' येतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. 'अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा', अशी कॅप्शन या फोटोसोबत लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणं आकाराला येणार का, याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेउन जाणार आहेत. बाकी कोणीही नाही. हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर कोणाचाही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का ?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विचारला. बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला, त्यांचासोबत शिवसेनेने व्यवहार केला. उद्धव ठाकरे यांना आता शिवसैनिकांकडे प्रतिज्ञापत्र मागावी लागत आहेत, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनेवर ही वेळ आली, याचे सर्व श्रेय उद्धव ठाकरे यांनाच जाते. केमिकल लोचा कोणाचा झालाय, हे स्पष्ट दिसत आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत