'सामना'ने सर्व बंडखोर आमदार आणि खासदारांच्या जाहिराती नाकारल्या. मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपसोबत सत...
'सामना'ने सर्व बंडखोर आमदार आणि खासदारांच्या जाहिराती नाकारल्या.
मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपसोबत सत्तेत जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ता दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे दैनिक 'सामना'त जाहिराती देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मातोश्रीवरून 'सामना'त एकाही बंडखोराची जाहिरात घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे दैनिक 'सामना'ने सर्व बंडखोर आमदार आणि खासदारांच्या जाहिराती नाकारल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. भाजपसोबत वेगळी राजकीय चूल मांडूनही शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरे हेच आमचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत आहेत. मात्र, यावेळी 'मातोश्री'ने बंडखोरांच्या जाहिराती नाकारून त्यांना कठोर संदेश दिला आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत यासंदर्भात भाष्य केले. मी सर्वप्रमथ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही दरवर्षी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साह आणि आनंदाने साजरा करत असतो. आमच्यापैकी अनेकजण सामना वृत्तपत्रात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती देतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही जाहिराती देण्यासाठी 'सामना'शी संपर्क साधला. मात्र, या जाहिराती स्वीकारण्यात आल्या नाहीत. 'सामना'तील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले होते, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले. मात्र, 'सामना'कडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'सामना'तील मुलाखतीवर भाष्य करणे टाळले. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत