युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये ;युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी....... पुणे प्रतिनिधी : मुख्...
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये ;युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी.......
पुणे प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेतील ४० आमदारांचे पाठबळ मिळाले. आमदारांनंतर आता खासदार आणि पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांची साथ देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर नेत्यांची हकालपट्टी सुरू असताना बंडखोरीचं लोण युवासेनेतही पोहोचलं आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये आसे असून त्यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकलं आहे.
युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच सहसचिव किरण साळी यांनाही आदित्य ठाकरे यांनी काढून टाकलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पदाधिकाऱ्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कोण आहेत किरण साळी?
युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची ओळख आहे. किरण साळी हे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांचे खंदे समर्थक मानले जातात. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातून युवासेनेत फूट पडणार हे निश्चित मानलं जातं होतं आणि त्याप्रमाणे साळी यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होणं पसंत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी नुकताच पुणे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्तांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत साळी यांची हकालपट्टी केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिवपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मेळाव्यात बोलताना किरण साळी म्हणाले होते की, 'आजपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारानुसार व शिकवणीनुसार पक्षात १५ वर्ष काम केले. संघर्ष करताना विविध आंदोलनांमुळे अनेक केसेस माझ्यावर झाल्या. मात्र मी कधीही डगमगलो नाही. सतत पक्षहित समोर ठेवून, पक्षबांधणीसाठी काम केले. मात्र कधीही मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले नाही. आज मुख्यमंत्र्यांना ग्वाही देतो की,आपण द्याल ती जबाबदारी व सांगाल ते काम मी प्रमाणिकपणे करीन. आगामी काळात माझे मार्गदर्शक माजी मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी अव्याहत कष्ट घेऊ आणि संघर्ष करू,' असं साळी यांनी म्हटलं होतं.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत