हरित क्रांतीचे शिलेदार, अन्न सुरक्षाचे जनक : अण्णासाहेब शिंदे - बाळासाहेब हांडे प्रतिनिधी : हरित क्रांतिचे शिलेदार, अन्न सुरक्षाचे जनक...
हरित क्रांतीचे शिलेदार, अन्न सुरक्षाचे जनक : अण्णासाहेब शिंदे - बाळासाहेब हांडे
प्रतिनिधी : हरित क्रांतिचे शिलेदार, अन्न सुरक्षाचे जनक, सुधारित बियाण्यांकडे विशेष लक्ष देणांरे आणि खास करून लक्ष घालणारे, कृषी संशोधन क्षेत्रात भरीव काम करणारे माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांची भूमिका विशेष मोलाची होती. नुकताच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजधानी दिल्लीत एक खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार संजय जगताप, कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुनील शास्त्री, माजी खासदार नरेंद्र जाधव, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मंडळी हजर होती.
हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्यात देशाला स्वावलंबी करण्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांची भूमिका मोठी मोलाची होती, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी काढले.
अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अण्णासाहेब शिंदे फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील शास्त्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे यांचे सुपुत्र अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर मुख्य समस्या अन्नधान्याची होती. अण्णासाहेब शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्यासोबत हरित क्रांतीचा पाया देशात रोवला. शेतीचे वाण, शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणून उत्पादन वाढविल्याने देश अन्नधान्यांमध्ये आता स्वावलंबी झाला आहे. अण्णासाहेब शिंदे यांनी सलग १५ वर्षे केंद्रात काम करताना या क्रांतीचा पाया रचला होता, असेही पवार यावेळी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तसेच सिंचनाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. देशातील ५० टक्के शेतीचे सिंचन झाल्यास खेड्यातील युवक शहराकडे रोजगारासाठी येणार नाहीत्, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील सिद्धार्थ शास्त्री यांचेही भाषण झाले. त्यांनी अण्णासाहेब शिंदे यांच्यासोबत असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. यावेळी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सचिन फडतारे व सचिन इटकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अॅड. दिलीप शिंदे यांनी केले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार नरेंद्र जाधव, आमदार संजय जगताप, अभिनव गोडसे, उद्योजक डॉ प्रशांत कोंडूसकर, अॅड. सिद्धार्थ शिंदे, प्रफुल्ल पाठक, यांच्यासह दिल्लीतील अनेक मराठी अधिकारी व वकील उपस्थित होते.
अण्णासाहेब शिंदे केंद्रात कृषी मंत्री असतानाच्या काळात भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात मला त्यांच्यासोबत काम करता आले असे स्वामीनाथन म्हणतात. पुढे ते म्हणाले की, सन १९६२ मध्ये त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली. कृषी विज्ञानासाठी अण्णासाहेबांनी केलेल्या काही महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद ठेवणे उपयुक्त ठरेल. अण्णासाहेबांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात त्यांनी सी. सुब्रमण्यम, जगजीवन राम आणि फखरुद्दीन अली अहमद यांच्यासारख्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसमवेत काम केले. सर्व मंत्र्यांचा अण्णासाहेबांबद्दल मोठा विश्वास आणि आदर होता.
सन १९६०च्या दशकात अण्णासाहेब आठवड्यातून एकदा तरी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) शेतात भेट देत असत. मी डॉ. नॉर्मन ई बोरलॉग यांच्याकडून मिळालेल्या गव्हाच्या वाणांवर काम करत होतो. सन १९६४मध्ये भारतात अन्नधान्याची परिस्थिती गंभीर झाली होती. अमेरिकेकडून पीएल ४८० (public law 480) कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात गहू आयात करावा लागला. परराष्ट्र तज्ज्ञांनी भारताच्या दुर्दशेचे वर्णन 'हाता तोंडाशी गाठ' असे केले. मेक्सिकोहून मिळालेल्या गव्हाच्या वाणाची लागवड केली, तर परिस्थिती बदलू शकते हे मी मांडले, त्याला अण्णासाहेबांनी त्वरित पाठिंबा दिला. गव्हाच्या वाणाचे दोन प्रकार, लेर्मा रोजो - 64A आणि सोनोरा - 64 भारतात चांगले काम करत होते. म्हणून मी शेतकऱ्यांच्या शेतात राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रस्तावित केला.
अण्णासाहेब राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उत्साही समर्थक होते. सी. सुब्रमण्यम यांनी गहू, तांदूळ, संकरित मका, संकरित ज्वारी आणि संकरित बाजरीचे राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या माझ्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. सन १९६५ मध्ये मेक्सिकोमधून २५० टन बियाणे आयात करण्यास मान्यता मिळाली.
सन १९६५मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अण्णासाहेब आमच्या गव्हाच्या शेतात घेऊन आले. ‘जय जवान, जय किसान' हा नारा देणारे शास्त्री शेती आणि शेतकरी समर्थक होते. त्यांनी मेक्सिकोमधून लेर्मा रोजो - 64A १८ हजार टन बियाणे आयात करण्यास मान्यता दिली. सन १९६८मध्ये हरितक्रांती घडविण्यास आम्हाला मदत केली. सन १९७२मध्ये अण्णासाहेबांनी मला सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाचे व्यावसायिकरण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले.
पाणी आणि पिके कुशलतेने हाताळण्यासाठी लहान शेतकरी एकत्र आले, तरच कृषी क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असेल, असा अण्णासाहेबांचा विश्वास होता. दुग्ध उत्पादनात हे घडले, पण कृषी क्षेत्रात घडू शकले नाही, हे भारताचे दुर्दैव ! अण्णासाहेब कोरडवाहू शेतीवरील संशोधन अधिक वाढविण्याच्या गरजेवर भर देत असत आणि हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (आयसीआरआयएसएटी) स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.














कोणत्याही टिप्पण्या नाहीत