अमित ठाकरे पुणे जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे यांच्या निवास स्थानी जेवणासाठी गेले मुंबई प्रतिनिधी : मनसे नेते अमित ठाकरे हे तीन दिवसांच्या पुणे...
अमित ठाकरे पुणे जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे यांच्या निवास स्थानी जेवणासाठी गेले
मुंबई प्रतिनिधी : मनसे नेते अमित ठाकरे हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या प्रयत्न केला. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेत पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी पाऊलं उचलण्यास सुरुवात देखील केली आहे. या सगळ्या धावपळीत पुणेकरांना मात्र अमित ठाकरे यांचा साधेपणा कमालीचा भावलेला दिसत आहे. पुण्यातील न्यूमवी शाळेत ढोल पथक वादनाच्या तयारीला भेट देत स्वतः कमरेला ढोल बांधून अमित ठाकरे यांनी वादन केले होते. त्यानंतर याच दौऱ्यातील आणखी एका कृतीने अमित ठाकरे यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.
अमित ठाकरे रविवारी हे राजगुरूनगरच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठक संपन्न झाल्या. त्यांनतर सहा वाजता बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे पुणे जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे यांच्या निवास स्थानी जेवणासाठी गेले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आपल्या एका कार्यकर्त्यासाठी दाखवलेली आपुलकी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अमित ठाकरे यांच्या या कृतीचे मनसैनिक आणि नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
त्यानंतर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी देखील आपला अनुभव सांगत जमिनीवरील नेता म्हणत अमित ठाकरेंचे कौतुक केले आहे. योगेश खैरे यांनी फेसबुकवर अमित ठाकरे यांचे फोटो शेअर केले. त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.योगेश खैरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमितसाहेब ठाकरे सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 'महासंपर्क' दौऱ्यावर आहेत. त्या अंतर्गत रविवारी राजगुरूनगर येथे विद्यार्थ्यांशी संवाद आणि बैठका होत्या. संध्याकाळी सहा वाजता बैठका संपल्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगले यांच्या घरी जेवण करण्यासाठी सगळेजण गेलो. तेव्हा अमित ठाकरे यांच्या कृतीने सर्वजण भारावून गेले.
समीर थिगले यांच्या घरात १० ते १२ जण आम्ही जेवण करण्यासाठी बसलो. सर्वात आधी अमितसाहेबांचं जेवण उरकलं आणि त्यानंतर एक एक करत सर्वांचं जेवण उरकलं आणि नेहमीप्रमाणे मी शेवट राहिलो. सगळे उठले होते त्यामुळे मला अवघडल्या सारखं झालं आणि मी पण उठायला लागलो. आणि तेवढ्यात...."तुम्ही निवांतपणे शांत जेवण करा.... मी आहे तुमच्या शेजारी !" असं म्हणत हात धुण्यासाठी आत गेलेले अमितसाहेब माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांना माझी अडचण कळली होती. माझं जेवण पूर्ण होईपर्यंत ते गप्पा मारत शेजारीच बसले.

.webp)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत